महसूल, पोलीस व आरटीओ पथकाचा पहाटे ५ वाजता छापा; एकूण २९ वाहनांवर कारवाई
पाचोरा:
पाचोरा तालुक्यातील मौजे कुरंगी येथील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर महसूल, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांच्या संयुक्त पथकाने १८ सप्टेंबर रोजी पहाटे मोठी धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान गिरणा नदीपात्रात अनधिकृत उत्खनन आणि वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली एकूण २९ वाहने पथकाने ताब्यात घेतली आहेत. या सर्व वाहनांसह यंत्रसामग्री आणि वाळू साठा मिळून अंदाजे ३ कोटी ६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैध वाळू वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत.
कुरंगी परिसरातील नदीपात्रात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती मिळताच संयुक्त पथकाने भल्या पहाटे ५:०० वाजता अचानक छापा टाकला. यावेळी नदीपात्रात अवैध उत्खनन आणि वाहतूक करताना ही वाहने रंगेहात पकडण्यात आली. जप्त करण्यात आलेली सर्व वाहने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, खत कारखाना येथे सुरक्षितरीत्या लावण्यात आली आहेत.
सदर कारवाई उपविभागीय अधिकारी (पाचोरा भाग) श्री. भूषण अहिरे, पाचोरा तहसीलदार श्री. विजय बनसोडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (जळगाव व भडगाव), पाचोरा पोलीस निरीक्षक श्री. राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. प्रदीप शेवाळे (पाचोरा), सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती कल्याणी वर्मा (पिंपळगाव हरे), निवासी नायब तहसीलदार श्री. विनोद कुमावत यांच्यासह पाचोरा, नांद्रा, कुऱ्हाड खुर्द, पिंपळगाव बुद्रुक आणि नगरदेवळा बुद्रुक येथील मंडळ अधिकारी, पहूर व बोदवड पोलीस ठाण्याचे कर्मचारी, पाचोरा तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच पाचोरा व भडगाव येथील ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पथकाने केली.
ताब्यात घेण्यात आलेल्या वाहनांचा नियमानुसार पंचनामा करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध प्रचलित महसूल व इतर लागू कायद्यांनुसार पुढील कडक कारवाई करण्यात येत आहे. गिरणा नदीपात्रातील अवैध उत्खनन व वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी यापुढेही नियमितपणे तपासणी व कारवाई सत्र सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.







