महाराष्ट्र लेखणी वृत्त
पाचोरा तालुक्यातील पत्रकारितेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या कार्याचा गौरव करत मराठी पत्रकार विकास असोसिएशनने एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. असोसिएशनचे अध्यक्ष पत्रकार राहुल महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकारिता ही केवळ बातम्या देण्याचे माध्यम नसून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि लोकशाही अधिक सक्षम करण्याचे प्रभावी साधन आहे. पाचोरा शहरासह पंचक्रोशीतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रातील घडामोडी अनेक वर्षांपासून आपल्या लेखणीतून जनतेसमोर मांडणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांच्या योगदानाची दखल घेत हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकारांच्या घरी जाऊन त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी पत्रकारितेच्या माध्यमातून शहराच्या विकासात आणि सामाजिक जडणघडणीत दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सन्मानपत्र, पुष्पगुच्छ आणि शाल देऊन ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
या सन्मान सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार संदीप महाजन, शिवाजी शिंदे, दिलीप जैन, सुरेश तांबे, शांताराम चौधरी, सचिन सोमवंशी, चिंतामण पाटील, सुनील पाटील, प्रवीण ब्राह्मणे आणि रविशंकर पांडे यांचा सन्मान करण्यात आला. उर्वरित ज्येष्ठ पत्रकारांचाही आगामी काळात याच पद्धतीने सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष राहुल महाजन यांनी दिली.
या उपक्रमाच्या आयोजनासाठी उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, सचिव नंदकुमार शेलकर, सहसचिव चिंतामण पाटील, प्रसिद्धी प्रमुख अन्वर शेख, सदस्य छोटू सोनवणे, निखिल मोर, संदीप परदेशी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.







