5.3 C
New York
Sunday, November 15, 2026

Buy now

spot_img
spot_img

गिरड शिवारात दुष्काळ पंचनाम्यांना सुरुवात

सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, मका व तुरीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी; शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
गिरड, ता. भडगाव : यंदाच्या हंगामात पावसाच्या अनियमिततेमुळे शेती पिकांवर झालेल्या परिणामाच्या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील गिरड शिवारात दुष्काळ व पीक नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात झाली आहे. महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शेतशिवारात प्रत्यक्ष भेट देत विविध पिकांची पाहणी करून नुकसानीची नोंद करण्यास सुरुवात केली आहे.
गिरड परिसरातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद, मका आणि तूर या प्रमुख पिकांची लागवड केली आहे. मात्र, पावसाची अनियमितता व प्रतिकूल हवामानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी पंचनामे महत्त्वाचे ठरणार आहेत.
पंचनाम्यादरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली. पिकांची वाढ, सद्यस्थिती, झालेली हानी तसेच अपेक्षित उत्पादन याबाबत आवश्यक नोंदी घेण्यात आल्या. नुकसानग्रस्त प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांची वस्तुनिष्ठ नोंद होऊन शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहू नये, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
यावेळी गिरड येथील तलाठी अनिता सुतार, कृषी सहाय्यक बनसोडे मॅडम, पोलीस पाटील विनोद मनोरे, माजी सरपंच संजय भिकन पाटील, संजय मोतीराम पंडित, झिपरू, अरुण रामराव, महेश मोहन, बबन मनोरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून पीक नुकसान भरपाई, दुष्काळी मदत अथवा अन्य सवलती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासन स्तरावर अहवाल सादर करावा आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!